दिनांक – १२/०५/२०१४
जुन १९९९ मध्ये २१ दिवसाच्या ईशान्य भारताच्या प्रवासाला आम्ही सारे गेलो
होतो. परतीच्या प्रवासात सिलीगुरी मुक्कामी काजव्यांशी मुलाकात झाली. माझी जवळजवळ
त्यांच्याशी वीस वर्षानंतर भेट तर माझ्या मुलांची आयुष्यातील पहिली भेट. माझ्या
आणि मुलांच्या काजव्यांशी झालेल्या त्या ऐतिहासिक भेटीची हि कविता जून १९९९ मध्ये
लिहिली होती आज १२/०५/२०१४ रोजी तिला संस्कारित केली..
कविता – काजव्यानो
काजव्यानो अनेक तपानंतर
ह्या दूर देशी अचानक तुमची गाठभेट
आजही सर्द चिंब आषाढी तीन्हीसांजेनंतर
धावत्या चांदण्यांनी भरलेले आकाश
तुम्ही जमिनीवर फुलविलेले ||
लहानपणीसारखा बेभानपणे
तुमच्यामागे धावणारच होतो
अचानक जाणवले तुम्हाला कधीही न अनुभवलेल्या
माझ्या शहरी कच्या – बच्यांची नाळ
हवी जोडावयाला हवी तुमच्याशी ||
त्यांना शिकवून त्यांच्या हातून तुम्हाला पकडून
दोन तळहातांच्या पोकळीत घेतल्यावर
तुमच्या कळत-नकळत अश्या स्पर्शाने
झाला कोवळा रोम रोम, अन
हिरवट पिवळ्या मायावी प्रकाशाने
झळाळले तळहात अन मन ||
पूर्वीचे ते सकाळला काड्यापेटीतले
तुमचे निर्जीव होणे टाळले कटाक्षाने
सोडल्यावर उडती चांदणी होऊन
निघून जाणे तुमचे पाहिले भरल्या मनाने ||
काजव्यानो भेटीने या उलगडले सारे पदर आपल्या नात्यांचे
पण जुळले का हो नाते माझ्या कच्या-बच्यांशी तुमचे ? ||
पूर्वी कधीतरी दापोलीत काजवे पहिले होते. पण आज हि कविता वाचतानाच समोर टी व्ही वर एक जाहिरात चालू होती ज्यात ती मुलगी हाती काजवा पकडते, तेंव्हा प्रकाशाने उजलेली तिची ओंजळ आणि क्षणात ती त्या काजव्याला सोडून देते तेंव्हा उडत जाणारा तो प्रकाशाचा टिपका. कविताच दृष्यमान होऊन समोर साकारावी ….
ReplyDeleteप्रत्येक क्षणी मुलांचा विचार करत, आयुष्यातील प्रत्येक छोटा मोठा आनंद त्यांना देण्याचा हरेक प्रयत्न करणाऱ्या बाबाला सलाम!