नोकरी सोडताना – 3
मी वीस वर्षे महानगरपालिकेत नोकरी
केली, तिथे मिळालेल्या जाणकारी आणि अनुभवामुळेच मी आज जो काही आहे तो आहे. महानगरपालिकेतून
बाहेर पडण्याची अनेक करणे होती – क्षेत्रामध्ये नवे काही करण्याची, नवे अनुभव
घेण्याची, आर्थिक प्रगती इत्यादी पण बाहेर पडण्याचे सर्वात महत्वाचे कारण होते महानगरपालिकेच्या
वातावरणातून, तंत्रातून बाहेर पडणे. मी एका अश्या संस्थेत होते जी राजकारणाची आणि
तदनुषंगाने येणाऱ्या साऱ्या चांगल्या – वाईट गोष्टींची प्राथमिक शाळा आहे, पाठशाळा
आहे. अश्या संस्थेत प्रदीर्घ काळ काम करताना तुम्ही कितीही शुद्ध, स्वच्छ नैतिक
राह्यचा प्रयत्न केलात तरी अनेक कारणामुळे तुम्हाला अनेक तडजोडी (compromises) करावकराव्या लागतात आणि अश्या
प्रत्येक वेळी मला जाणवायचे कि माझ्या मनाच्या/आत्म्याच्या आरश्याचा पारा थोडा
आणखी उडाला आहे आणि तसे सतत होणे म्हणजे एक दिवस माझे मन मला माझ्या चांगल्या –
वाईट कर्मांचा हिशोब देण्याच्या लायकीचे न उरणे.
“तोरा मन दरपन केहेलाये है | भले
बुरे सारे करमोको देखे और दिखाये | ची शक्यताच संपणे.
प्रश्न माझ्या हातून होणाऱ्या
चांगल्या-वाईट कर्मांचा नव्हताच तर त्यांचे मुल्यांकन करणाऱ्या मापदंडाने / मनाने
भ्रष्ट होण्याचा होता. अश्या या गंभीर धोक्याचा सामना करण्याचा एक मार्ग होता
महानगरपालिका योग्य संधी मिळताच सोडणे आणि ते मी केले. ह्या साऱ्या विचारांच्या
पार्श्वभूमीवर मी नोकरीचा राजीनामा देण्याच्या काही दिवस अगोदर झाली पुढील कविता
-----
कविता – पारा उडालेला आरसा
पाऱ्याचा नवा मुलामा घेईस्तोवर
वा तुटून फुटून चकनाचूर होईस्तोवर
पारा उडालेल्या आरश्याच्या नशिबी
असते अडगळीतले उपेक्षित जिणे |
पारयाचे ठिगळ लावताही येत नाही
पारा उडालेल्या जागी आरश्याला,
खरवडून काढताही येत नाही
सहजासहजी उरलेला पारा आरश्याला,
भट्टीत तावून सुलाखून
पाऱ्याची एकसंध नव्हाळी घेऊन
घ्यावाच लागतो पुनर्जन्म आरश्याला
||
पुनर्जन्माचे अग्निदिव्य देऊ घेतले आहे
देण्या नवा मुलामा सत्वाचा, आत्म्याच्या आरश्याला
विखरून मुक्त होईन ह्या छिन्न
अस्तित्वातून
वा झळाळेन अग्निपक्षासारखा
पुनर्जन्मून राखेतून
तुम्हाला अन काळालाच ठेवले आहे साक्षीला ||
No comments:
Post a Comment