Friday 11 April 2014

नव्या संबंधांची हि कविता निरंजन केवळ तुझ्यासाठी


प्रत्येक सृजनाची (कवितेची) स्वतःची एक जन्म कथा असते. ह्या कवितेच्या सृजनाची आठवण आणि संदर्भ फारसा सुखद नाही. हि कविता सुचली माझे दिवंगत मित्र प्रसिद्ध कवी निरंजन उजगरे ह्यांच्याघरी घरी दर्शनासाठी ठेवलेल्या त्यांच्या पार्थिवाच्या आणि त्यांच्या चाहूल ह्या किवितेच्या सान्निध्यात १३/१२/२००४ रोजी. ह्या कवितेच्या सृजनाचा संदर्भ आणि भावनाच अश्या काही होत्या कि त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी हि कविता विस्मृतीत ढकलून दिली होती.

आताही हि कविता बाहेर आली कारण २५/०१/२०१४ रोजी माझे आणि निरंजनचे common मित्र कवी हेमंत जोगळेकर आमच्याकडे रहायला आले, अर्थात त्यांच्या कवितांचे वाचन, गप्पा झाल्या. त्या दिवशी त्यांनी त्यांचा नवा कवितासंग्रह ‘तिसरा डोळा’ भेट दिला त्यामध्ये त्यांनी निरंजन वर केलेली कविता छापली आहे. ती वाचली आणि  माझ्या कवितेची आठवण झाली. एवढेच नव्हे तर हेमंत जोगळेकरांच्या त्या मुलाखतीमुळे कवितेकडे/लिखाणाकडे पुन्हा वळलो. मग गेले दोन महिने अडगळीत टाकलेल्या वह्या, कच्या कवितांचे चिठोरे शोधण्याची मोहीम झाली आणि शेवटी दोन दिवसापूर्वी सारे काही सापडले आणि शेवटी आज ती ब्लॉगवर ठेवत आहे.

ह्या कवितेला निरंजन उजगरे यांच्या ‘चाहूल’ कवितेचा संदर्भ आणि तिच्यामुळेच अर्थ असल्यामुळे ती कविताहि त्यांच्या हस्ताक्षरात येथे दिली आहे.


































नव्या संबंधांची हि कविता

गळून पडतील हे ठाऊक असूनही,
तुला पार करावयाची होती,
सावल्यांच्या प्रदेशातील अरण्ये,
आमच्या कवितांचे काजवे हाती घेऊन |

      सारे कळून सवरून काय मागितलेस हे,
      निरागसपणे पण एका हट्टी मुलासारखे |

तू जेंव्हा निघालास  पार करीत सावल्यांच्या प्रदेशातील एक एक अरण्ये,
आमच्यापाशी नव्हत्या कविता वा त्यांचे काजवे,
सैरावैरा फिरत होतो आम्ही त्या अरण्यांच्या काठावर,  
त्या घनघोर भयावह सावल्यांमधून तुला शोधून परत आणण्यासाठी |

     आता तू सावल्यांच्या अरण्यापलीकडे, आम्ही अलीकडे,

     ह्या नव्या संबंधाची हि कविता केवळ तुझ्यासाठी ||

2 comments: