Friday 18 April 2014

कविता – तुझाच एकाधिकार

दिनांक १८ / ०४/ २०१४
१९९५-९६ च्या सुमाराची कविता आज संस्कारित केली.

कविता – तुझाच एकाधिकार

देत राहतोस मनस्वीपणे अनेकानेक
      क्षण संगती न लागणारे,
            मैत्र जोडणारे, समृद्ध करणारे
                  मोहात पाडणारे, पतन करणारे |

निमुटपणे सामोरा मी क्षणांना
      दिलासा मिळवण्या तुझ्या असण्याचा,
            त्या क्षणांमधील तुझ्या दर्शनाने
संभ्रमच वाढतोय तुझ्या असण्याचा |

नाकारू कसा ह्या क्षणातून भेटणाऱ्या तुला
      हे भेटणेच आधार तुझ्या अनंत शोधाचा,
नको वाटतो आता हा खेळ
क्षणाक्षणातून तुला शोधण्याचा |

जातच राहीन तरीही क्षणांमधून सामोरा तुला
      अगणित भरल्या क्षणांनी मला रिता ठेवणे
            वा एका दिव्य क्षणाने पूर्ण भरणे
                  हा एकाधिकार तुझाच

                        सर्वस्वी तुझाच ||

1 comment:

  1. आपुला संवाद आपणाशी ……. किंवा प्रतिमेच्या अनेक बाह्य आवरणात हरवत चाललेल्या स्वत:चा हा शोध.
    का ते माहित नाही पण ही कविता वाचताच रॉय किणीकरांची "उत्तररात्र " आठवली.
    ते म्हणतात ………………

    घे शब्दकोश, ई... ईश्वर शोधुनी काढ
    तो आत्मा दडला कुठल्या शब्दा आड
    अर्थाला असते बंधन का शब्दांचे
    कोसळून पडले इमले अक्षरतेचे.. ||

    ReplyDelete