Tuesday 29 April 2014

नोकरीतला शेवटचा दिवस !!! कविता - संवाद

नोकरीतला शेवटचा दिवस !!!  

नोकरीतला शेवटचा दिवस काहींच्या आयुष्यात एकदा दोनदा येणारा तर काहींच्या आयुष्यात अनेकदा येणारा. बहुधा हा दिवस हृद, भाऊक, अविस्मरणीय असतो पण सर्व नोकरदारांच्या आयष्यात एकदा तरी येत असल्यामुळे सर्व विशेषणे वापरता येतील इतक्या विविधतेने तो येतो
माझ्या आयुष्यात नोकरी सोडण्याच्या प्रसंग तीनदा आला सगळ्यात पहिली trainee account clerk ची नोकरी तीन महिन्यातच मी संपवली कारण काही दिवसातच त्याहून चांगली, कायमी अशी सरकारी नोकरी खात्रीने मिळणार होती आणि कदाचित मी जरी चालू ठेवली असती तर त्यांनीच मला काढून टाकले असते. खासगी कंपनीतील ह्या पहिल्या नोकरीला लागलो तेंव्हा अवघा २० वर्षाचा होतो. तिथे रुळलोच नाही त्यामुळे नोकरीतीन महिन्याच्या प्रोबेशन पीरियड संपण्याच्या दिवशी राजिनाम्याचे पत्र खरडून निघून आले. फार कोणी मित्र झाले नव्हते, जिवही गुंतला नव्हता किंवा तो गुंतण्याइतकी पोच (maturity) हि नव्हती.
दुसरी नोकरी गुजरात सरकारच्या सेल्स टॅक्ष विभागात कारकून म्हणून सात महिने केली, पण पहिल्या आणि ह्या दुसऱ्या नोकरीत रुजू होताना हेतू मनाशी स्पष्ट एकीकडे शिकत राहयचे आणि मनासारखे शिक्षण पूर्ण झाले कि किंवा दुसरी ह्याहून चांगली मिळाली कि हि नोकरी सोडवायची. त्यामुळे त्या नोकरीकधीही मी एक स्टोप गॅप म्हणूनच पाहत होतो. इथे थोडे फार संबंध निर्माण झाले पण लक्ष शिक्षणात आणि अधिक चांगल्या नोकरीकडे होते त्यामुळे जीव गुंतण्याचा प्रश्नच नव्हता. अचानक नशिबाने ह्या नोकरीपेक्षा खूप चांगली अधिकारपदाची नोकरी आणि ती पण स्वतःच्या क्षेत्रातली बडोदे महानगर पालिकेत मिळाली त्यामुळे त्या आनंदात आणि नव्या नोकरीत लगेच रुजू व्हायचे असल्यामुळे, सरकारी तंत्राकडून राजीनामा मंजूर करून घेण्यात नोकरीचे शेवटचे सात दिवस कसे गेले ते कळलेच नाही निरोप समारंभ तर बाजूला मला शेवटचा दिवस आठवतही नाही.
तिसरी महानगरपालिकेतील नोकरी २० वर्ष आणि ९ दिवस केली. ह्या नोकरीत घडलो, अनुभवाने, - ज्ञानाने मानाने मोठा झालो. संस्थेशी, घटनांशी, त्यातल्या लोकांशी नुसता जोडला गेलो नव्हतो तर झाडांची मुळे एकमेकांत एकजीव व्हावीत तसे झाले होते. हि नोकरी सोडताना मात्र फारच अवघड गेले मलाही माझ्या सहकाऱ्यानाही. २३ जुलै २००२ ला राजीनाम्याची नोटीस आणि सुरु झाला प्रदीर्घ निरोपाचा कालखंड ज्यात अनेक भावना, अनेक मरणे मी जगलो, भावनिकदृष्ट्या समृद्ध झालो. अर्थातच अनेक कविताही झाल्या ह्या कालखंडात. सुरवात निवृत्तीच्या दोन तास आधी नोकरीच्या शेवटच्या दिवशीच्या अनुभवातून सुचलेल्या कवितेने करूया.

निवृत्तीचा शेवटचा दिवस विलक्षण होता. मी २३ जुलाईला राजीनामा दिल्यापासून जसजसा माझ्या निवृत्तीचा दिवस जवळ येत गेला तसतसा मी आणि माझे सहकाऱ्यामधील संवाद शब्दांपलीकडे जात गेला. शेवटच्या दिवशी तर मला माझे सहकारी पुन्हा पुन्हा येऊन भेटत होते, मी त्यांना भेटत होतो पण आम्हाला शब्दांमध्ये काहीच व्यक्त करता येत नव्हते कारण शब्दच निघत नव्हते. अश्रू आणि स्पर्शाने शब्दांची जागा घेतली होती, अश्रू आणि स्पर्शच संवादाची भाषा झाले होते. अश्या परिस्थितीत पुढल्या ओळी गुजराथी भाषेच्या माध्यमातून साकार झाल्या – 

कविता - संवाद 


મારે ઘણું બધું કેહવું હતું,
તમારૂ  કેટકેટલુ સાંભળવું  હતું,
થયા છે હવે આપણા સંબંધો શબ્દોથી પર,
છોડીએ આપણા સંવાદો આંસુ - સ્પર્શની ભાષા પર ||
(Originally composed on 30/10/2002 during 2.00 to 4.00 pm - revised on 27/04/2014 - 9.0 to 9.30 pm)

खूप काही सांगावयाचे होते मला,
खूप ऐकावयाचे होते तुमचेही मला,
संबधच झाले आता शब्दांपलीकडले आपले,
सोडूया अश्रूंच्या-स्पर्शाच्या भाषेवर संवाद आपले ||  (translated on 26/04/2014)

No comments:

Post a Comment