Wednesday 23 April 2014

कविता - मामाच्या गावाला

दिनांक २३/०४/२०१४
मामाच्या गावाला जाऊया

झुकझुक झुकझुक अगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
हे जवळजवळ संपूर्ण गाणे यथार्थपणे लागू पाडणारे आमचे बालपण. दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी आली कि धुरांच्या रेषा हवेत काढणारी झुकझुक अगीनगाडी मामाच्या गावाला घेऊन जात असे. गाण्यातल्या प्रमाणे मामाचा गाव – मुंबई आमच्या बडोद्याच्या तुलनेत खरच खूप मोठा होता – वेगवेगळ्या स्थळांनी, वस्तूंनी, पदार्थांनी सजलेला !!
मामा हजारवार रेशीम घेणाऱ्यातला तालेवार नव्हता पण आम्हा भाचरांसाठी मनाने नक्कीच तालेवार होता आणि शिकरणीला पंचपक्वान्न मानण्याच्या आमच्या आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीची समज असलेली आम्ही भाचरे होतो त्यामुळे अपेक्षाभंगाची पाळी आली नाही त्याने त्याला जमेल तेवढे करून ती येऊ दिली नाही.
माझे बालपण कथा कादंबऱ्यामध्ये वर्णविल्यासारखे समृद्ध, सुंदर, स्वप्नवत करणाऱ्या अनेक गोष्टीनपैकी एक होता माझा वसंतमामा ! त्याची पहिली अप्रत्यक्ष आठवण म्हणजे १९६७ मी सहा – सात वर्षाचा होतो तेंव्हा कोकणातील कासार्डे ह्या गावी मला आयुष्याचे पहिले पुस्तक पोस्टाने मिळाले आणि ते पुस्तक देणारी व्यक्ती होती वसंतमामा ! ते पुस्तक होते स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचे. त्यांचे देहावसान १९६६ मध्ये झाल्यावर १९६७ मध्ये अगदी लहान मुलांसाठी चित्रकथेच्या स्वरुपात काढलेले ते पुस्तक होते. अर्थात त्या पुस्तकाचा संदर्भ, महत्व सारे मला समजून आले त्यानंतर दहा-पंधरा वर्षानंतर. सुट्टीमध्ये सगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा खजिना त्याच्याघरी मिळावयाचा. त्याकाळी आवडलेल्या बाबुराव अर्नाळकर आणि त्या प्रकारच्या इतर लेखकांशी भेट झाली त्याच्याघरीच. संपूर्ण वर्षाचा सिनेमाचा कोटा मुंबईत पुरा व्हायचा त्याच्यामुळेच.
त्याच्या Camera ने फोटोग्राफी मला करू देणारा आणि जुना का होईना दूर हातात धरून फोटो काढण्याचा तो Box Camera मला भेट देणारा वसंत मामाच. आजही मी तो जपून ठेवलेला आहे.  मी १० वीत असताना बैदाकरी-पाव हा प्रकार खायला घालणारा वसंत मामाच. संपूर्ण वर्षाचा सिनेमाचा कोटा मुंबईत पुरा व्हायचा त्याच्यामुळेच आणि आधी संघाचा स्वयंसेवक, नंतर पेशाने शिक्षक असल्यामुळे सामान्य परिस्थितीची जाण ठेऊन जबाबदारीने वागण्याचे, अभ्यासू होण्याचे वेळोवेळी माझे बौद्धिक घेणारही तोच.
जमलेकी वेळ काढून भेटायला येईन हे त्याला आणि अनेकांना मी सांगत राहतो आणि ती माणसे एक दिवस भेटण्याच्या पलीकडे निघून जातात. गाडीतून दिसणारी पळती झाडे आता मी पहात नाही तर सतत पाळणाऱ्या मला हि जुनी झाडे पहात असतात.
वसंतमामाला कविता करावयाला आवडत असत. माझ्या ब्लोगवर मी ‘पुन्हा कवितेकडे’ हि कविता ठेवल्यावर ती त्याला अवधुतने वाचून दाखवल्या ती सुधरावयास हवी अशी प्रतिक्रिया वसंतमामाने अवधूतद्वारा दिली होती. कवितेवरच्या त्याच्या सूचना घ्यायच्या राहून गेल्या. अश्या वसंतमामासाठी तो गेला त्या दिवसापासून घोळत असलेली आणि आज त्याच्या तेराव्याला पूर्ण झालेली हि कविता ----
कविता - मामाच्या गावाला
दूर देशीच्या आजोळाने,
हव्याहव्याश्या सुट्टीने,    
धुरांच्या रेषा हवेत काढीत
झाडांना पळवित  
मामाच्या मोठ्या गावाला नेणाऱ्या
झुकझुक अगीनगाडीने,
नटलेले बालपण
मोठे होण्याच्या स्वनात सरले
काळाच्या ओघात ती सुट्टी, ते आजोळ,
ती झुकझुक अगीनगाडी गेली
आता मामाही गेला ......
आज, उद्या कधीतरी
या जीवनाला लागेल मोठी सुट्टी तेंव्हा
अगीनगाडीने जाईन मी

मामा गेला त्या मामाच्या मोठ्या गावाला 

2 comments:

  1. एक मानसशास्त्रीय सत्य आहे, "प्रत्येक माणसाला त्याची जी कोणी आपली म्हणून माणसे आहेत ती सर्व सोबत हवीच असतात, किमान तो/ ती जिवंत असे पर्यंत तरी! आपल्यासकट प्रत्येकालाच त्या प्रवासास एक ना एक दिवस जायचे आहे हे मान्य करून सुद्धा! मग तरी स्वत:चा, या जगाचा निरोप घेण्याचा अशा रितीने उल्लेख का करावासा वाटतो तुम्हाला?

    ReplyDelete
  2. माझ्या अनेक कवितांमध्ये हा उल्लेख आहेच हळूहळू जश्या त्या मी ब्लोगवर ठेवत जाईन तसा तो स्पष्ट होईल. जगाच्या निरोपाची खरच खूप उत्सुकता आहे, इच्छा आहे, कुतूहल आहे. it may sound cliche पण खूप आधी पासून तांब्यांची कविता 'नववधू प्रिया मी' आणि तश्या अनेक कवितानी मनात घर केले आहे.
    या कवितेत शेवटच्या ओळीच, जगाचा निरोप, (मोठी सुट्टी - मामाच्या गावाला जाणे) अत्यंत सयुक्तिक आहेत आणि कवितेच्या सुरवातीस जे मांडले आहे त्याच्याशी जुळते.

    ReplyDelete