दिनांक २५/०५/२०१४
कविता - आठवणींमध्ये तुझ्या जगण्यासाठी
आपल्याला न दिसणारे, खूप दूर भासणारे
सातत्याने स्वतःचे निर्मम अस्तित्व जाणवून देणारे
ते मायावी, अज्ञात क्षितीज अचानक झडप घालते
आपल्यातल्या कोणालाही मनस्वीपणे त्याच्या पल्याड घेऊन जाते |१|
ते क्षितीज असते अनंत दशदिशातून आपल्याला वेढणारे
कुठनही, कसेही, केव्हाही, कोणालाही त्याच्या पल्याड नेणारे
हे ठाऊक होते म्हणूनच स्वतःला तुला वेढून चालत होतो
त्या अज्ञाताला हुलकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होतो |२|
काही उमजायाच्या आत सारे प्रयत्न निरर्थक ठरवून
त्या घातकी क्षितीजाने नेलाच तुला हिसकावून
आता भेट नाही आपुली अट्टाहासाने तुझ्या मागे येऊनही
वा क्षितीजाने त्याच्या पल्याड आणूनही |३|
आठवणींमध्ये तुझ्या जगण्यासाठी
क्षितीजाने त्याच्या पल्याड नेउच नये कधीही
नेउच नये कधीही .......
No comments:
Post a Comment