Tuesday 2 December 2014

कविता - त्याचे बोलणे

कविता - त्याचे बोलणे  - 

( दिनांक - १०/११/२०१४ संध्याकाळी ६.३० ते ८.३० पुणे येथे )


पुन्हा तो भरभरून बोलू लागलाय
अगदी लहानपणी बोलायचा तसा
कधी घाई घाईने, कधी उत्कंठा वाढवत,
कधी पोक्तपणे, कधी मानभावीपणे,
सतत, पुन:पुन्हा सांगायचा 
शाळेत म्हटलेली नवी बडबडगीते,
शिकलेली मुळाक्षरे, गणिते, 
ऐकलेल्या नव्या गोष्टी, झालेली भांडणे,
दिवसभरात घडलेल्या गमती जमती,
आठवतही नाही असे बरेच काही
सुखाची परमावधी होती
त्याचे ते बोलणे ऐकण्यात          ||

मधल्या काळात तो बोलायचा थांबला
अंतर कोशातच जणू काही गेला
आशाच सुटली मनाची
त्या सुखाच्या पुनरानुभूतिची               ||

कोषात गेलेल्या सुरवंटातून
फुलपाखराने बाहेर येऊन
सुखवावे जसे मनाला बागडून
तसा तो बोलू लागलाय भरभरून             ||   

आताही तो बोलतो लहानपणी सारखा
कधी अचंबून, कधी समजून घेत,
कधी तावा तावाने, कधी शांतपणे,
बदलणाऱ्या जगाविषयी,
जगण्याच्या नव्या रीतीविषयी,
माहिती तंत्राच्या क्रांतीविषयी,
क्रिएटीव कॉमन्स सारख्या संकल्पनांविषयी
स्टीव जॉब्स, स्नोडेन,
रॅप संगीत, एमेनेम,
राजकारण, अर्थकारण,
अनेकानेक बाबींविषयी                       ||

त्याचे असे पुन्हा भरभरून बोलणे
सुखाची हवीहवीशी पुनरानुभूति होणे
त्याचे पुन्हा लहानपणी सारखे  बोलणे

सुखाच्या वर्षावात माझे भिजून जाणे             ||


1 comment: