Wednesday 1 April 2015

कविता – चालताना काळाच्या पायवाटेवरून

दिनांक - ०१/०४/२०१५ 

जीवन जगणे हा काळाच्या पायवाटेवरचा प्रवास. ह्या प्रवासात काही चांगले - काही वाईट कालक्षण येतच राहतात शेवटी पायवाटेवरचा प्रवास संपवणारा क्षण येई पर्यंत. वाट्याला येणाऱ्या क्षणांना आपण कसे सामोरे जातो त्यावरून आपली जीवन जगण्याची रीत ठरते, तत्वज्ञान ठरते. कुठली एक रीत, पद्धत वा तत्वज्ञान श्रेष्ठ नाही.

ही कविता १९९६ साली सुचली पण तेंव्हा ती काही जमली नाही, पूर्ण नाही होऊ शकली कदाचित तेंव्हा जीवनाचा अनुभव ही अवघा ३५ वर्षांचा होता, आता ती झाली कारण आणखी २० वर्ष जीवन जगणे झाले. सात - आठ ओळी ज्या तेंव्हा खरडल्या होत्या त्या फाडून फेकून नाही दिल्या म्हणून आज ही कविता शक्य झाली........


कविता – चालताना काळाच्या पायवाटेवरून

(मूळ लेखन ०२/०२/१९९६; पुनर्लेखन २९/०३/२०१५ सकाळी ९.३० ते १०.३० बडोदे घरी)

चालताना काळाच्या पायवाटेवरून
बाभळीच्या काट्यासारखे काही क्षणांचे खोल रूतणे
उपाय एकच, दुखले कितीही तरी काटा काढणे
आतच राहू दिले मी त्यांना
भोगण्या निरंतर त्या वेदनांना             ||

चालताना काळाच्या पायवाटेवरून
कोसळणे दरडीसारखे काही क्षणांचे मार्ग खुंटणे 
उपाय एकच, नसा तटतटल्या, तुटल्या तरीही दरडी दूर करणे
पडून राहू दिले मी दरडींना
खुंटण्या कायमचे माझ्या मार्गांना          ||

चालताना काळाच्या पायवाटेवरून
तुटलेल्या विक्राळ कड्यासारखे काही क्षणांचे उभे ठाकणे
उपाय एकच, भोवळणे-घसरणे टाळून कडा उतरून जाणे
भोवळलेले राहू दिले मी स्वतःला
अनुभवण्या क्षणांच्या विक्राळतेला          ||

चालताना काळाच्या पायवाटेवरून
क्षणांनी काटे, दरडी, कडा असे अनेक होणे
उपाय एकच, काहीही करून अशा क्षणांना मिटविणे
मऊसुत, ओलसर मातीसारखे राहू दिले मी मला

घडविण्या मनस्वीपणे क्षणांनी या जीवनाला              ||

1 comment:

  1. अनेकदा एखादी कलाकृती कलाकाराचाच अनुभव असण्याचा गैरसमज सर्वसाधारण प्रत्येकाचा कधी ना कधी होत असतो, त्यामुळे तसा तो न करून घेण्याचे भान सतत ठेवावे लागते. पण तुमच्या कविता वाचताना ते भान दूर ठेऊन त्या वाचण्याचे, त्या समजून घेण्याचे भान ठेवावे लागते, इतक्या त्या खऱ्या, आणि अनुभवसंपन्न असतात. म्हणूनच प्रत्येक कविता ही एक कल्पना मनात घेऊन त्यावर केलेले शब्दखेळ वाटत नाहीत, इतका खोलवर त्यात अनुभव रुजलेला दिसतो. व्यक्त झालेल्या प्रत्येक विचाराचे खोल मूळ तुमच्या मनात रुजलेले असावे आणि ती अनुभूती इतरांपर्यंत पोहचविण्याचे माध्यम म्हणजे या कविता. म्हणूनच लिहिते रहा !!!!!

    ReplyDelete