Thursday 30 April 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी ८ - कविता – त्वं ज्ञानमयोविज्ञानमयोसी

दिनांक - ३०/०४/२०१५ - शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी  ८  

हल्लीच्या पिढ्यांचा (त्यात मी पण आलो)  सर्वात मोठा प्रोब्लेम देवाला कसे मानायचे, कसे  स्वीकारायचे कारण  भौतिक शास्त्र, खगोलशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, एकूणच ज्या ज्या क्षेत्रातले ज्ञान घेत जावे तसे तसे देवाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होत जातो, त्याचे उच्चाटन होत जाते. 'त्वं ज्ञानमयोविज्ञानमयोसी' असे मानून ज्ञानाची - विज्ञानाची कास धरावी तर ज्ञानच देव ह्या संकल्पनेना उडवून लावते, त्याचे अस्तित्व नाकारते, आणि तरीही मनाला देव ही संकल्पना, संस्था हवी असते. उदा. इतिहास वाचल्यावर त्यातून धर्मैतिहास वाचल्यावर प्रश्न मनात उभा राहतो, एके काळी ज्या देवताना त्या त्या संस्कृतीचे लोक पुजत होते, नवस सायास करत होते आणि त्या देवता त्यांना पावतही होत्या त्या कशा संपल्या. त्यांना मानणारे संपले तशा त्या देवताही संपल्या ( झ्यूस आणि इतर ग्रीक देवता, फेरो, अनुबिस अशा ईजिप्तमधील प्राचीन देवता, हरप्पा - मोहंजोदारो, अझटेक, माया इत्यादि अनेक संस्कृती ज्यांच्या देवतांची नावेही ठाऊक नाहीत ). त्या देवतांनी त्यांना मानणाऱ्यांचा संपूर्ण विनाश का होऊ द्यावा? देवताना माहित नव्हते का की आपल्याला अनुसरणारे संपले की आपणही संपू?

मानवी संस्कृती संपल्या म्हणून त्यांच्या देवता संपल्या हे एक उदाहरण झाले, आपल्यायेथे तीच संस्कृती चालू असून आणि आपण सर्व वेद प्रामाण्य मानणारे असूनही वेदातील अनेक देवता गेली हजार वर्ष पुजाल्याच जात नाहीयेत एवढेच नव्हे तर आज त्या आपणाला माहीतही नाहीत आणि तरीही नाही काही त्या देवतांचे बिघडले, नाही त्या नाराज झाल्या, नाही आपले काही बिघडते आहे. त्यांना विसरून आपण दुसऱ्या देवतांची आराधना करतो, एवढेच नव्हे तर नव्या देवता उदयाला अगदी या २० शतकात आपल्या येथे तरी येत आहेत. याचे उदाहरण म्हणजे संतोषीमाता या देवतेचा १९६० - ७० च्या कालखंडात उदय.

कोणी ह्यावर म्हणेल देव ही एक शक्ती आहे किंवा तो एकच आहे आणि ज्या त्या माणसाला तो त्याला भावेल त्या रुपात पहायची स्वतंत्रता आहे,  तेंव्हा संस्कृती गेल्या, काही देवता मागे पडल्या, नव्या पुढे आल्या त्याने देव ही संकल्पना मानव निर्मित आणि त्याच्या बरोबर संपणारी ठरत नाही. त्याच्या कुठल्याही रूपाचे तुम्ही पूजन केलेत, श्रेष्ठत्व स्वीकारले की ते त्याच्या मूळ स्वरूपाला पोचते. सृष्टीची उत्पत्ती-लय, संस्कृतींचा उदय-अस्त हे सारे देवाच्या इच्छेनुसारच घडते आहे. स्वतःच्या काही स्वरूपाचा लय ही सुद्धा त्या शक्तीचीच इच्छा. शिवाय जो पर्यंत व्यक्ती, लोक, समाज देवाला मानतो आहे, आस्तिक आहे तो पर्यंत सर्व देव किंवा वेगवेगळी रूपे ही एकाच देवाची / शक्तीची रूपे असल्यामुळे त्यांचे (व्यक्ती, समाज) काही वाईट होण्याचा प्रश्न नाही. देव सर्वज्ञ आहे त्याला तुमचा भाव कळतो इत्यादी. तेंव्हा जग आणि त्यातील सर्व सजीव -निर्जीव गोष्टी देवनिर्मित आहेत. आस्तिक मनाला ही भूमिका खरच दिलासा देणारी आहे, असते; एक मोठी चिंता दूर होते असा अर्थ / असे समर्थन / असा युक्तिवाद कोणी देवाच्या अस्तित्वाविषयी केला की ....

प्रश्न मात्र  जे सुरवाती पासून नास्तिक आहेत किंवा ज्ञान-विज्ञानाच्या अभ्यासामुळे जे नास्तिक होतात किंवा नव्या बदलेल्या संदर्भात, परिस्थितीत देवाला डोळसपणे कसा स्वीकारायचा हा प्रश्न ज्यांच्या समोर आहे त्यांचा आहे, ज्या ज्या गोष्टींचे ज्ञान मिळते तिथे तिथे देवाचे अस्तित्व मिटते आहे पण त्याच बरोबर ज्ञानाच्या आजच्या मर्यादा पण स्पष्ट होत आहेत. म्हणजे ज्या गोष्टीची उत्तरे सध्या विज्ञाना जवळ नाही, तिथे तिथे देव मानायचा उदा. कृष्णविवर काय आहे ते कळले पण त्याच्या आत जाऊन ते आतून कसे असते हे माहित नाही किंवा त्यात शिरलो तर बाहेर कुठे, कसे आणि केंव्हा निघू  ते ठाऊक नाही म्हणजे मग पूर्वी चंद्रावर देव असायचा त्याप्रमाणे आता कृष्णविवरात देव मानायचा का?

ज्ञात गोष्टीतून निर्विवाद पण ज्ञान-विज्ञानाने देवाची उचल बांगडी केली आहे पण पूर्णपणे देवाचे अस्तित्व रद्द केलेले नाही कारण अनेक गोष्टींसाठी विज्ञानाजवळ आज तरी उत्तर नाही त्यामुळे विज्ञानाला जे अज्ञात आहे आणि ते अजून बरेच काही आहे त्याठिकाणी  देवाला मानण्यासाठी पुरेशी जागा आहे / शक्यता रहाते, दिसते आणि मग ज्ञानाची कास धरल्यामुळे नास्तिक झालेल्या माझ्यासारख्यांना एक आशेचा किरण दिसतो, ज्ञानाला, आधुनिकतेला स्वीकारून, योग्य मात्रेत  देवाचे अस्तित्व स्वीकारणे शक्य होते. असे अनेक उलट सुलट विचार अमेरिकेत दोन महिने सतत एकटा असताना मनात चालू होते अजूनही आहेत. त्या कालखंडात केलल्या अज्ञात विषयीचा कविता ब्लॉगवर वेळोवेळी ठेवल्या आहेत त्यातलीच ही कविता ............

कविता – त्वं ज्ञानमयोविज्ञानमयोसी

(मूळ लेखन ३०/०६/१९९६ – ०१/०७/१९९६ मध्यरात्री ११.० ते १.० हॉटेल कार्लाईल, वॉशिंग्टन; पुनर्लेखन २६–२७/०४/२०१५ मध्यरात्री – सकाळी, बडोदे घरी)

त्वं ज्ञानमयोविज्ञानमयोसी
ज्ञान तू, विज्ञान तू
धरली म्हणून कास
ज्ञानाची, विज्ञानाची
अभ्यासात गेलो नित नवे पड उलगडणारे
ज्ञानाचे, विज्ञानाचे
ब्रम्हांडाच्या उत्पत्ति-लयाचे
सूर्य, चंद्र, ग्रह, ताऱ्यांच्या रचनेचे
संस्कृतींच्या विकासा-विनाशाचे
साम्राज्यांच्या उदय-अस्तांचे
धर्मांच्या गरजेचे अतिरेकाचे
मिळणाऱ्या ज्ञानाच्या कणाकणांनी
पुसत – मिटत गेलास कलाकलानी               ||

ज्ञानानेच अस्तित्व तुझे मिटले
सूर्य, चंद्र, ग्रह, ताऱ्यांवरले
सप्त स्वर्ग-नर्काचे आकाश पाताळातले
घर तुझे मोडले, वास्तव्य तिथले नुरले
संस्कृतींच्या लोपातून जाणवले
त्यांच्या सोबत अस्तित्व तुझेही संपले
संपली झ्यूस, फेरो, आणि अनेक अज्ञात रूपे
संपली वेदातली तुझी अनेक ज्ञात रूपे            ||

खूप जवळ, साध्या गोष्टीत होतास तू
आकलनाला, श्रद्धेला सोपा होतास तू
आता करोडो प्रकाशवर्ष दूर तू
अज्ञात निखर्व महाविश्वात दडलेला तू
कृष्णविवरांचा असाध्य मध्य तू 
सुक्ष्मातीसुक्ष्म गॉड पार्टिकल तू
ज्ञाना पलीकडील अज्ञानात तू
अज्ञात ज्ञात होईपर्यंतच अस्तित्वात तू            ||

ज्ञानात नाहीस तू
विज्ञानात नाहीस तू
असलासच तर श्रद्धेनेच अस्तित्वात तू

करूणेने, माणुसकीने माणसात तू                ||


No comments:

Post a Comment