Wednesday 8 April 2015

कविता – तुझ्या अनुभूतिंचा गर्भ

दिनांक - ०८/०४/२०१५

लहानपणा पासून माझा स्वभाव nostalgic आणि त्याच बरोबर भेटणाऱ्या व्यक्तीच्या आणि जिथे जिथे मी जाऊन राहत असे त्या जागेच्या प्रेमात पडण्याचा. आपल्या घरी परतणे तर हवे असे, हवे असे पण कुठल्याही ठिकाणाहून निघताना पाय अडत असे, मन नंतर जुन्या गोष्टीत, आठवणीत गुंतत असे काही वेळा त्रासही होत असे.  प्रयत्नांनी ह्या असल्या स्वभावावर नियंत्रण आणले पण आजही मी जिथे जिथे जातो ती जागा, तिथले वातावरण माझ्या मनात घर करतात. एकदा आधी ज्या ठिकाणी गेलेलो असतो त्या ठिकाणी पुन्हा गेलो की आधी ज्या ठिकाणी गेलेलो असतो त्या ठिकाणी (रस्ता, हॉटेल, वास्तू ) पुन्हा जायचा प्रयत्न करतो आणि जमले तर आठवणी पुन्हा जगतो. अनेक ठिकाणी आयुष्य पुन्हा जाऊ शकलो, अनेक व्यक्तींना पुन्हा भेटू शकलो. अनेकांना नाही.

इतक्या ठिकाणी फिरलो पण ज्या त्या ठिकाणी जाताना मन कधीही दोलायमान नव्हते, किंवा जाऊच नये असे वाटत नव्हते, मात्र १९९६ ला अमेरिकेला जाताना मात्र जाऊच नये असे वाटत होते, घर सोडण्याआधीच मी होमसिक झालो होतो, घराच्या सर्वांना सोडून जाण्याचे जीवावर आले होते. अशा परिस्थितीत मी अमेरिकेला गेलो आणि तिथल्या गोष्टी, तिथला निसर्ग, तिथले अनुभव या साऱ्या मनात घर करणार नाहीत याचा आटोकाट प्रयत्न केला पण तरीही तिथल्या अनुभूती, आठवणी ह्या मनात भरल्या गेल्याच त्या विषयीची ही कविता अमेरिका सोडण्याआधी एक आठवडा झालेली .......

 कविता – तुझ्या अनुभूतिंचा गर्भ

(मूळ लेखन २६/०६/१९९६, in TSS Office, दुपारी २.४५ ते ३.००; पुनर्लेखन ०५/०४/२०१५ संध्याकाळी ६.३० ते ६.४५ हॉटेल हॅरीस, जकार्ता)

उध्वस्त करणाऱ्या बलात्कारातून
राहिलेला नकोसा गर्भ कितीही अव्हेरला
तरी निर्मितोच बंध 
आठवणींचे, रक्तमांसाचे, भावनेचे                 
अटळपणे                                         ||

हे इथल्या निसर्गा
मी कवचाआडून एकटेपणाच्या,
आत्मशोकाच्या
प्राणपणाने प्रतिकार केला
तुझ्यात रममाण होण्याचा
तरीही राहिलाच आहे गर्भ
तुझा, तुझ्या अनुभूतिंचा माझ्या मनात
तो वाढत राहणार अणुरेणुत 

अटळपणे                             ||

No comments:

Post a Comment