Thursday 23 April 2015

शोध अज्ञाताचा साधण्या संवाद अज्ञाताशी - कविता – भोज्या तेंव्हाच कर

 दिनांक २३/०४/२०१५ 

देव, दैव, काळ, मृत्यू आणि माझ्यातला आतला मी हे सारे, हे पंचायन माझ्या 'अज्ञाताचा' भाग आहेत आणि ह्या अज्ञाताचा शोध चालू आहे सतत. मृत्युच्या अस्तित्वाचे सतत भान आपल्याला असूनही मृत्यूविषयी एरव्ही विचारही येऊ देत नाही आपण मनात पण काही वेळा तो यावा असे वाटते किंवा त्याच्याविषयी विचार करून पहावासा वाटतो. इतक्या वेळेस त्याची जवळून भेट होत असते किंवा इतके आपण सतत त्याच्याबरोबर लपाछपिचा खेळ खेळत असतो की आपल्याला अनेकदा जाणवते  की आत्ता आपण दिसलो असतो त्याला आणि भोज्या करून त्याने आपल्याला खेळातून बाद केले असते....... असे सारे विचार कवितेत उतरले एक दिवशी ....


 कविता – भोज्या तेंव्हाच कर – (मूळ लेखन ०९/१०/१९९६; पुनर्लेखन १८/०४/२०१५)

(मूळ लेखन ०९/१०/१९९६ संध्याकाळी ६.५० ते ७.१० बाईंच्या घरी; पुनर्लेखन १८/०४/२०१५ संध्याकाळी ७.४५ ते ८.३०)

अनेकदा माझी येण्याची
मनापासून तयारी असते, पण तू नसतोस         |

कित्येकदा तू अगदी जवळ असतोस
पण माझी तयारी नसते                       |

माझा नकार तू मानतोस
माझा हा गैरसमज, जप असाच                 |

लपाछपिचा हा खेळ
भले चालू दे कितीही वेळ                      |

भोज्या मात्र तेंव्हाच कर

जेंव्हा मी तयार असेन                        |


1 comment:

  1. गुंतला जीव कसा त्यास टाळतो
    जितके दूर पाळतो तितका
    तो मनाचा ताबा घेत जातो

    असाच एक दोनदा म्हणाला
    मला चल आज तू सोबत
    नकळत्या वयात नाही काही कळले
    थोडी पावले सहज चालले त्यासवे

    नंतर इवले इवले पाश गुंतता
    पुन्हा त्याचे दर्शन घडले, पुन्हा तीच हाक
    त्यासोबत पुन्हा थोडी चालले
    घरापाशी नेऊन त्याने पुन्हा हात दिला सोडून

    आता माहीत आहे तू जेंव्हा येशील
    तेंव्हा असेन अगदी निर्विकार निर्विचार
    आपली ओळख आहेच तेंव्हा कधीही
    तयार असेन तुझ्या सोबत चालायला

    फक्त एकदा हात हाती घेतलास तर
    पुन्हा कधीही न सोडण्यासाठी तो घे
    आणि फक्त एवढंच कर की
    माझ्यात गुंतल्या जीवाची
    थोडी तरी बाबा काळजी घे

    ReplyDelete