Wednesday 29 April 2015

नोकरीतल्या कविता - कविता – रहस्य पिसारा फुलविण्यामागचे

दिनांक - २९/०४/२०१५ 

ही कविता आधी ब्लॉगवर ठेवलेल्या नोकरीतल्या कविता पैकी - किंवा एकूणच आपण पुढे जाण्याच्या, अधिक मोठे होण्याच्या चढाओढी विषयीची, कराव्या लागणाऱ्या तडजोडी विषयीची, घेतलेल्या शोर्टकट्स विषयीची (अर्थाथ जाणूनबुजून आत्तापर्यंत तरी कुठला शोर्टकट घेतला नाही) सगळी प्रगती चांगल्या नशिबामुळे झाली तरीही वाटत राहिले आपण पुढे इतरांचा हक्क डावलून तर नाही आलो ना  ............

 कविता – रहस्य पिसारा फुलविण्यामागचे


(मूळ लेखन ०३/०७/१९९६ हॉटेल कार्लाईल वॉशिंग्टन रात्री ९.३० ते १०.०; पुनर्लेखन २५/०४/२०१५ दिवसभर घरी)

शिरायला, पुढे जायला बोटभरही जागा नसलेली
भरगच्च गर्दी अशी यशाच्या रस्त्यावर फुललेली
इतरांच्या पुढे जाण्याच्या नादात
जाणूनबुजून आडरस्ते निवडले
अधिक पुढे सतत पुढे राहण्याच्या हव्यासात  
पुन्हा पुन्हा आडरस्तेच चोखाळले                            ||

टाकून मागे सगळ्यांना चालून आडमार्गावरून
खूप पुढे घुसून चालताना गर्वाने राजमार्गावरून
माझी पावले जाणवली
चिखलाने, घाणीने माखलेली
घाणेरडे ठसे उमटवणारी
प्रगतीला, प्रतिष्ठेला न शोभणारी                      ||

खूप प्रयत्न केला साफ करण्याचा
नंतर अनेक प्रकारे झाकण्याचा
ओशाळलो, गडबडलो, ग्रासलो चिंतेने  
जाणण्या उपाय, न्याहाळले इतरांना निरूपायाने
कळले क्षणात रहस्य साऱ्या प्रथित यशस्वींचे
झाकण्या बेढब पाय मोराने पिसारा फुलविण्याचे                 ||

साऱ्यांनीच फुलवून पिसारे यशाचे आपापले
झाकली होती घाणीने माखलेली त्यांचीही पावले
कोणीही पाहत नव्हते त्यांची पावले
पाहणारही नाहीत कधीही हे ही कळले  
सारेच भुलणार यश-कीर्तिच्या इंद्रधनू पिसार्‍याला   
दुर्लक्षिणार आडरस्त्याने घाणलेल्या पावलांना                   ||

मीही आता उभा आत्मविश्वासाने
सोडून लाज बरबटलेल्या पावलांची
संमोहीन जगाला बेगडी सिद्धींच्या पिसाऱ्याने  

मग चिंता कशाला ह्या विद्रूप पावलांची                 ||


No comments:

Post a Comment