Monday 27 April 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी ७ - कविता – सोबत शीळ अज्ञाताची


दिनांक - २७/०४/२०१५ 

ही कविता अमेरिकेतल्या मानसिक, भावनिक एकांतातली ! त्या एकांतात अश्याच प्रकारच्या लिहिलेल्या इतर कवितांच्या मालेतील. स्वतः बरोबर एकटे असणे आणि स्वतः विषयी विचार करणे ही एक प्रकारे उपयुक्त कसरत, पण तितकीच अवघड. स्वतःच्या अंतरंगाचे दर्शन स्तिमित करणारे, घाबरवणारे, स्वतःविषयी घृणा, अपराधीभाव निर्माण करणारे त्याचसोबत अनेकदा सुखावणारे आणि अज्ञाताला शोधण्याच्या मार्ग दाखविणारे .....

कविता – सोबत शीळ अज्ञाताची

(मूळ कविता २७/०६/१९९६ हॉटेल कार्लाईल वॉशिंग्टन, मध्यरात्री ०.२० ते०.५० पुनर्लेखन १९-२०/०४/२०१५ बडोदे घरी )

एकटं असताना स्वतःशी एकांतात
झाला सुरु प्रवास स्वतःत नकळत
बंद झाली वाट परतीची शिरता आत
वाट चाचपडणे मग मनाच्या भुलभूलैयात
क्षणात जाणवले स्वतःशीश असणे
म्हणजे नर्क भोगणे, प्रायश्चित्त घेणे                    ||

आत चहूकडे पिशाच्ये संशयाची, अविश्वासाची
दलदल स्वार्थाची, असूयेची, मत्सराची
लिबलिबीत चिकट द्रव वासनेचा पाय घसरविणारा
दर्प हलाहलाचा प्राणीमात्र निष्प्राण करणारा
अमर्याद सागर लोभाचा गिळंकृत करणारा 
वडवानल अहंपणाचा सारं  सारं  भस्म करणारा           ||

अंतरंगाच्या दर्शनाने मी गलितगात्र, जडावलेला
एकाचवेळी रूतू, घसरू, घुसमटू, जळू लागलेला
अचानक कानात अज्ञात शीळ मोहणारी  
अमृताचा, आत्मभानाचा  कुंभ शोध सांगणारी
चालतोय वाट माझ्यातल्या सप्तनर्काना ओलांडणारी

सोबत आश्वासक शीळ अज्ञाताची गुंजणारी               ||


No comments:

Post a Comment