Tuesday 7 April 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी ....६ - कविता – निवड पर्यायाची

ब्लॉग – दिनांक ०७/०४/२०१५

माझ्या मते आपण सर्वांचे जीवन म्हणजे पदोपदी निरनिराळ्या पर्यायांतून त्या त्या वेळेस योग्य वाटेल तो पर्याय निवडत दोन अपर्यायी बिंदू (जन्म आणि मृत्यू) मधील जीवन जगणे. काही जण मृत्यू हा पर्याय म्हणून स्वीकारतात पण तो नाही निवडला तरी सतत अनेक योग्य, अयोग्य पर्यायांतून एक पर्याय निवडणे. पर्यायाची योग्य-अयोग्यता बहुधा त्या पर्यायाच्या अंती मिळणाऱ्या यशापयशावरून ठरते. पर्याय निवडताना असणारी अनिश्चितता, असुरक्षा, भय, यशस्वी होण्याची आकांक्षा इत्यादि मुळे तर देव ही संकल्पना टिकली नाही ना? अर्थात तिथे पुन्हा पर्याय निवड आहेच की देवाला मानावे की न मानावे? देवाच्या बाजूने पाहीले तर आपण त्याला मानले काय आणि न मानले काय त्याला काहीच फरक पडत नाही आणि खरे तर आपल्या बाजूने पाहीले तर आपणही देवाला मानले काय आणि न मानले काय ना जन्म वा मृत्यू टाळता येतो ना पर्याय निवडीतून सुटका थोडीच होते? तेंव्हा आपल्यासाठीही त्याला मानणे वा न मानणे निरर्थक !!! .........


 कविता – निवड पर्यायाची

(मूळ लेखन सप्टेंबर १९९६, पुनर्लेखन ०५/०४/२०१५ संध्याकाळी ६.० ते ६.३० हॉटेल Haris Suits)

कधी योग्य – अयोग्य पर्यायातून
कधी अनेक योग्य वा अनेक अयोग्य पर्यायातून
पदोपदी निवड करीतच रहायची अपरिहार्यपणे
निवडीचे स्वातंत्र्य कधी असणे कधी नसणे        ||

पर्यायाची निवड करावीच लागण्याचा
चिरंतन शाप प्रत्येकाच्या भाळावर
जन्म – मृत्युच्या बिंदू मधील
निरर्थक निवडीच्या श्वासोश्वासाचे 
शापित जीवन इथल्या प्रत्येकाला                ||

तुला मानण्याच्या वा नाकारण्याच्या  
पर्यायातून कुठलाही निवडला
तरी तुझ्यासाठी तो निरर्थक

तसाच आम्हासाठीही तो निरर्थक                ||


1 comment:

  1. जे नकळत प्रत्येकजण जगत असतो त्याबद्दलचा हा किती योग्य मांडलेला विचार!

    ReplyDelete