Sunday 26 April 2015

कविता - –घश्यात अडकलेले घास

दिनांक - २६/०४/२०१५ 

 कविता - –घश्यात अडकलेले घास


(मूळ लेखन १३/१०/१९९६; रात्री ८.१५ तो ८.३०; पुनर्लेखन १९/०४/२१०५ बडोदे घरी रात्री १.० ते १.३० )

फास्टफूड  सेंटरमधील 
टेबलावर आम्ही सारे
शेजारच्या जाळीतून
खाण्याच्या आकर्षक पदार्थांकडे
आशाळभूतपणे पाहणारे इवलेसे डोळे       ||

त्यांना माझे नजरेने दटावणे
हातवाऱ्यांनी हाकलणे
लोचट माशीसारखे त्यांचे खाण्यावर खिळणे
सवयीने माझे त्यांना दुर्लक्षणे
छोट्याला प्रेमाने घास भरवणे                   ||

मधल्या काळात त्या छोट्यांमध्ये
नजरेने, खुणांनी, हसण्याने
संबंध रूजलेले, वाढलेले                        ||

शेवटी न राहवून बेवारशी कुत्र्यासारखे
त्या नकोश्याला हाड हाड करून
छोट्याला घास द्यायला माझे वळणे             ||
माझ्या वागण्याने भेदरलेल्या
छोट्याच्या डोळ्यात भरलेला अविश्वास
तरीही चाचरत त्याचे पुटपुटणे
‘बाबा त्यालाही दे ना घास’                     ||

माझ्या घश्यात जन्मापासूनचे

सारे घास एकाचवेळी अडकलेले                 ||

1 comment:

  1. हा अनुभव अनेकांचा असेल. काहींच्या संवेदना तितक्या जागृत असतील काहींच्या नसतील. जन्माचे सारे घास माझ्या घशात अडकले हा अनुभव तुमच्या सारख्या एखाद्याचाच असेल.
    कवी म्हणून, कविता म्हणून इथपर्यंत सारे ठीक आहे, पण माणूस म्हणून माझा नेहमीचाच प्रश्न, एक माणूस म्हणून काय केलेत तुम्ही, लेकाच्या हट्टाखातर का होईना दोन घास त्या जीवास मिळाले कि नाही? हि घटना तशी वारंवार घडणारी, दर वेळी निरागस तुमचा लेक बरोबर नसतो, तेंव्हा तुम्ही काय करता? आजही परिस्थिती तीच तशीच कदाचित वाढत्या शहरीकरणाने अजून बिघडलेली.

    कवीने काही यावर उपाय शोधलाच पाहिजे असे नाही, पण तुमच्यातल्या माणसाने मात्र नक्कीच. एक माणूस प्रचंडकाय समाज आणि त्यातील खटकणाऱ्या सर्वच गोष्टी दूर नाही करू शकणार हे मान्य पण खारीचा, मुंगीचा वाटा नक्कीच उचलू शकतो ना? तर तुम्हीही ते करत असाल ह्या अपेक्षेने…….

    ReplyDelete