Thursday 2 April 2015

कविता – माझे संजीवक इवलेसे

दिनांक - ०२/०४/2015

 कविता – माझे संजीवक इवलेसे - मूळ कविता लेखन १६/०१/१९९६; पुनर्लेखन २८/०३/२०१५

(मूळ कविता लेखन १६/०१/१९९६ सकाळी ११.० ते १२.० विएमसी ऑफीस; पुनर्लेखन २८/०३/२०१५ सकाळी, बडोदे घरी)

साठवत मनात टाटा
त्यांच्या इवल्याश्या हातांचा
घर ते ऑफिस निघालेला मी             |
रस्त्यावर माझ्यासारखे अनेक
मनात घर ऑफिसला नेणारे  
रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांची
जातीव्यवस्था तोडून
चुकार एखादा पुढे जाऊ पाहणारा          ||

रस्त्याच्या कडेला
कणाकणाने झडत जात असलेला
नेहमीचा पाय मोडका भिकारी
नेमाने मनात वांझ कालवाकालव          |
त्यापुढे जागोजागी
काळ्याकुट्ट भविष्याची जाण नसलेली
घाणीत लडबडलेली
भान विसरून खेळणारी
पोरं बेगुमानपणे हसणारी           |
वर्दळ त्यांच्या आजूबाजूने
चिंतेने भविष्याच्या ग्रासलेल्या
सुखांनी ओशटलेल्या
शिळे हसणाऱ्यांची                ||

सवयीने गाडीतून उतरून
सवयीने सलाम घेत
वरिष्ठांना सलाम करणाऱ्यांना
सलाम भरण्याकरिता
ऑफिसला पोचलेला मी            |
ऑफिस संपवून घरी परतताना
काळवंडलेल्या सूर्यप्रकाशाने
वाहनांच्या निळ्या-काळ्या धूराने
दिव्यांच्या निस्तेज प्रकाशाने
फोलपाटाप्रमाणे उडून गेलेल्या
दिवसभराच्या क्षणांचा भार वाहत निघालेल्या
रिक्त, यंत्रवत गर्दीने
रस्ते, आसमंत भकासलेले                      ||

रस्त्यावर पुन्हा तेच
थोड्या फार फरकाने
तोच भिकारी, तीच पोरं, तीच माणसे
मनात अनुभवत तेंच तेंच
बुडबुडे स्युडो भावनांचे                         |
वेळ ही जगण्याची आस संपण्याची
रस्ता आयुष्याचा हरवण्याची
तरीही रस्ता घराचा राहतो कापीत
माझे इवलेसे उभे असतात
माझ्या प्रतीक्षेत
काळोख्या बोगद्याच्या शेवटी असणारा

संजीवक प्रकाश होऊन                  ||

No comments:

Post a Comment