Thursday 16 April 2015

क्षण जगतो वर्तमानातले

ब्लॉग लिहिला दिनांक – १३/०४/२०१५; ब्लॉगवर ठेवला १६/०४/२०१५ 

एकूणच माझ्या आयुष्यात खूप प्रवास लिहिलेला आहे. कॉलेजमध्ये असताना NCC मुळे झाला, नोकरीत असताना फार नाही पण निरनिराळ्या कारणांमुळे बऱ्यापैकी झाला. २००२ मध्ये नोकरी सोडल्यावर दर महिन्याला सरासरी दहा दिवस या संख्येने गेली १३ वर्ष फिरतो आहे देशातील – परदेशातील शहरांमध्ये. अति महागड्या हॉटेल्स ते सध्या गेस्ट हाउस मध्ये, काही तासापुरते ते काही दिवसांचे वास्तव्य होते. काही ठिकाणी एकदाच जाणे झाले आहे, तर काही ठिकाणी अनेकदा. या निरनिराळ्या ठिकाणी रहाण्याचा एक मोठा फायदा म्हणजे अगणित प्रकारच्या रचना, रंगांचा – प्रकाशाचा – जागेचा – साहित्याचा सर्जक आणि कल्पक उपयोग पहायला नाही तर अनुभवायला मिळाला.  रहाण्याची जागा आवडणे, तिचे चित्र मनात कोरले जाणे आणि त्या जागेत राहण्याचा अनुभव कडू-गोड आठवण होऊन आपल्याबरोबर आपल्या अस्तित्वाचा कायमचा भाग होणे हे ओघाने, अटळपणे आले.

आठवणी म्हटल्या की त्या केंव्हाही, कुठेही, कशाही आठवणे आले. त्या कितीही सुखद असल्या तरी त्यांना एक ते क्षण गेल्याच्या, पुन्हा न मिळण्याच्या विषादाची झालर असतेच. प्रश्न हा पण पडतो की अशा ह्या आठवणी सांभाळायच्या  तरी किती व कुठवर. त्याहून महत्वाचे म्हणजे त्या पुन्हा पुन्हा जगायच्या की क्षणा क्षणाला उलगडत जाणाऱ्या पण केव्हाही एका क्षणात कायमचा संपवणाऱ्या अशा वर्तमानाला जगायचे.

मी वर्तमानातल्या क्षणांना भरभरून जगण्याचे निवडले आहे. ह्या साऱ्या अनुभूतिविषयीची ही कविता मनात बरेच वर्ष घोळत होती, बाली सारख्या सुंदर जागेला सोडणाच्या वेळी शेवटी ती आकाराला आली.......    

 कविता – क्षण जगतो वर्तमानातले

(मूळ लेखन – १२/०४/२०१५ सकाळी १०.० ते.१२.० हॉटेल बाली कुटा रिसॉर्ट)

जाणे माझे निरनिराळ्या शहरात
रहाणे माझे वेगवेगळ्या जागेत
कधी एकाच जागेत पुन्हा पुन्हा
कधी एकदाचे परत न येण्या पुन्हा               ||

नसूनही वास्तव्य ते कायमचे
अटळपणे गुंतू लागणे मनाचे
कोरले जाणे खोलवर स्मृतीचीत्रांचे
घट्ट गुंफणे मग भावनांच्या बंधांचे              ||

ठिकाण सोडताना पाय जडावणे
मागे वळून पुन्हा पुन्हा पाहणे
जमेल तेवढे आठवणीत साठवणे
परतूनही जगात आपल्या ते सारे आठवणे               ||

हे सारे गुंतणे क्षणात मागे पडले
उमजले क्षणिक अस्तित्व स्वतःचे इथले
येणार नाही काहीच सोबत मनातले, जगातले
कुठेही आता क्षण जगतो फक्त वर्तमानातले             ||


No comments:

Post a Comment