Tuesday 28 April 2015

कविता – छाया काळाची, लेख नियतीचा

दिनांक - २८/०४/२०१५

मे ते जुलाई १९९६ ह्या दोन महिन्यातील वॉशिंग्टन येथील मुक्कामात दर शनी-रवि म्युझियममध्ये जाऊन मी स्मिथसोनिअन ची सारे जगप्रसिद्ध म्युझियम्स पहिली, पण ती पाहता पाहता शेवटी शेवटी त्या म्युझियम्स मधल्या अगणित वस्तू डोक्यात पोचयाच्या बंद झाल्यासारखे वाटले कारण किती पाहणार आणि किती मेंदूत साठवणार !!! त्याचच शेवटी शेवटी ह्या कवितेत मांडलेला भाव डोकावू लागला, अमेरिका सोडण्याला दोन दिवस बाकी असताना शेवटचे म्युझियम पाहिले आणि ही कविता आकाराला आली .........

 कविता – छाया काळाची, लेख नियतीचा

(मूळ लेखन ०२/०७/१९९६ हॉटेल कार्लाईल – वॉशिंग्टन मध्यरात्री ०.३० ते २.०; पुनर्लेखन २३/०४/२०१५ सकाळी आणि दुपारी, बडोदे घरी )

दालना मागून दालनात म्युझियममध्ये
भिंतीवर, घडवंच्यांवर, काचेच्या कपाटांमध्ये
मृतांच्या, लोपलेल्या संस्कृतींच्या, इतिहासातल्या
विविध वस्तू हारीने, निगुतीने मांडलेल्या          ||

प्रत्येक वस्तूला क्रमांक, सन, काही माहिती
वस्तुंसारखीच सुबक पण मृत, निरर्थक
अज्ञात नियतीचा लेख मात्र स्पष्ट मांडणारी
वस्तूंवर टाकलेल्या झगमगीत प्रकाशातही
जाणवत राहिली त्यांच्यावर पडलेली
थंडगार काळी छाया काळाची 
अस्वस्थ, उदास करणारी           ||

हळू हळू वस्तूंऐवजी
ती छाया काळाची,
तो लेख नियतीचा
जागोजागी दिसू लागला
घुसमटून टाकणाऱ्या त्या सावटलेल्या
मृतांच्या खजिन्यातून, जगातून
डोळे घट्ट मिटून,
जीवाच्या आकांताने पळालो
माझ्या जिवंत दुनियेकडे                 ||

घेऊन मोकळ्या हवेतील
दीर्घ श्वास सुटकेचा
डोळे उघडले आश्वस्तपणे
जीवनाने रसरसलेल्या प्रत्येकावर,
जगातल्या साऱ्या वस्तूंवर  
पाहीली पसरलेली तीच
घनघोर छाया काळाची

अन लेखही नियतीचा कोरलेला                  || 

No comments:

Post a Comment