Saturday 25 April 2015

त्याच्या वतीने केलेली कविता

दिनांक २५/०४/२०१५ - त्याच्या वतीने केलेली कविता 

ही कविता माझा एक प्रकारे काही बाबतीतील गुरु आणि वयाने – ज्ञानाने जेष्ठ असा मित्र, उत्कृष्ट इंग्रजी भाषा शिक्षक, अनुवादक, लेखक, कवी आणि महत्वाचे म्हणजे रसिक अशा कै. श्रीराम खांडेकर यांच्या मुळे, त्यांच्या संदर्भात लिहिलेली. मी मे ते ऑगस्ट १९९६ भारता बाहेर असताना त्याची हृदयाची यशस्वी by-pass सर्जरी झाली होती (१९९६ साली हे ऑपरेशन आजच्या इतके रुटीन आणि सुरक्षित झाले नव्हते त्यामुळे हे ऑपरेशन ठरले की आभाळच कोसळायचे व्यक्तीवर, कुटुंबावर आणि त्याच्या सुह्र्दांवर). त्यानंतर सप्टेंबर १९९६ च्या शेवटच्या आठवड्यात आमच्या बरोडा अॅमॅच्युअर्स ड़ॅ्मॅटिक क्लब या संस्थेचा हीरक महोत्त्सव  साजरा झाला त्यात त्याचे पूर्ण उत्साहाने सामील होणे फार सुखावणारे होते. त्या समारोहात त्याच्याशी बोलताना मृत्युच्या जबड्यात (ऑपरेशन) जाण्याआधी आणि मग शुद्धीवर आल्यावर मनात आलेल्या भावना विचार ह्या विषयीचा लेख लिहिण्यास सांगीतले पण तो विचार माझ्या मनातही घोळत राहून ही कविता लिहिली गेली ९ ऑक्टोबरला. त्याला ती दाखवायची होती आणि त्याच्या सारख्या संवेदनशील मनाला, लेखकाला हृदयरोगाविषयी कळल्यापासून ते ऑपरेशन आणि नंतरचे पुनर्जीवन ह्या साऱ्याविषयी आलेला अनुभव त्याच्याकडून ऐकायचा होता पण ते राहिले आणि काही दिवसांनी मी कामासाठी २९ ऑक्टोबरला कानपूरला गेलो. तेथे पोचलो आणि बातमी कळली श्रीराम खांडेकर आम्हा साऱ्यांना सोडून गेले आणि अनेक आठवणी मनासमोर तरळून गेल्या .........

श्रीराम खांडेकर म्हणजे बालसुलभ उस्फुर्त, unpredictable, धक्कादायक वागण्याच्या स्वभावाची व्यक्ति, मित्र. आम्हा सर्वांना सोडून जातानाही तसाच वागला. त्याचे राग लोभ आग्रही, आत्यंतिक. त्याच्यातले मुल सदैव टवटवीत होते, मुलाचे वागणे कधी खूप सुख देते, कधी त्रासही देते पण मुलाच्या वागण्यावर जसा कायमचा कोणी राग धरीत नाही तसाच श्रीराम यांच्यावर, त्यांच्या वागण्यावर कधी कायमचा कोणालाही राग धरता आला नाही. किती आठवणी – थोडे फार चिकन खाऊ लागलेल्या मला मासे आणि इतर नॉनव्हेज, ड्रिंक्स यांची चव त्याने शिकवली, प्रेमाने खाऊ पिऊ घातले, नाटक, साहित्य, गाणे याविषयीची रसिकता वाढवली, मराठी वाङ्मय परिषद बडोद्याचा अध्यक्ष झाल्यावर ती बातमी सांगायला भल्या पहाटे घरी येणे (आम्हा दोघांकडे तेंव्हा साधा फोन पण तेंव्हा नव्हता), ऋत्विक तान्हा असताना त्याला आंघोळ घालावीशी वाटली म्हणून भल्या पहाटे घरी येणे, मी त्याला न आवडत्या नाट्यलेखकाचे नाटक दिग्दर्शित करावयास घेतले म्हणून माझ्यावर खूप नाराज होणे पण ते छान केल्यावर मनापासून अभिनंदन करून अबोला तोडणे.......... अशा अनेक आठवणी  

त्याने मी सांगितलेल्या कल्पनेवर काही लिहिण्याआधी त्याच्या भूमिकेत जाऊन, त्याच्या वतीने विचार करून आगाऊपणाने लिहिलेली, जी त्याला ऐकवायची बाकी राहिली होती ती ही कविता त्याच्या स्मृतीला अर्पण .....

 कविता – तुझ्याकडे बेभान धावत सुटलेला मी (मूळ लेखन ०९/१०/१९९६; पुनर्लेखन १८/०४/२०१५)

(मूळ लेखन – ०९/१०/१९९६ बडोदे घरी रात्री १०.० ते १०.२०; पुनर्लेखन १८/०४/२०१५ बडोदे घरी संध्याकाळी ५.३० ते ६.३० )

विरोध करीत राहिलो
प्राणपणाने तुझ्या अटळपणाचा
सरकणाऱ्या पट्ट्यावरून तुझ्याकडे
आपोआप ओढले जाण्याचा                     ||

माझ्या विरोधाच्या निरर्थकतेतून
जन्मलेला तुझा दुःस्वास 
तुझ्याकडे सरकणाऱ्या पट्ट्यावरून
माझे उलटे दूर पळणे                         ||

कळलेच नाही केंव्हा पोचलो
तुझ्या कराल मिठीमध्ये
ऐनसमयी अज्ञाताची की तुझीच
भाकलेली करुणा अभावितपणे                   ||
  
नंतर अपेक्षे विपरीत असा
अतीव स्निग्ध, मायाळू स्पर्श
किती वर्षांनी कोणीतरी
झोपवले होते मांडीत                          ||

सारी जिजीविषा, सारं भान विसरवणारी
तुझ्या मांडीतली साखरझोप तुटली
त्या नतद्रष्ट प्रार्थनांपायी मांडीवरून ढकलून
तू विक्राळ, दगडी झालेला                      ||

काळाच्या सरकत्या पट्ट्यावरून मी
बेभान धावत सुटलेला तुझ्याकडे                 ||   


No comments:

Post a Comment